शिवसेनेला अजून एक मोठा झटका; ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिलाय.

Updated: Jun 26, 2022, 08:13 AM IST
शिवसेनेला अजून एक मोठा झटका; ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा title=

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिलाय. ठाणे महापालिकेचे महापौर त्यांनी काम पाहिलंय. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येतेय.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडलीये. अशातच शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्विट करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.

"भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा...जात, गोत्र अन् धर्म अमुचा... शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!", असं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज ठाण्यात शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केलं.