नाक घासून माफी मागा नाही तर... अनिल परब यांचा किरिट सोमय्या यांना इशारा

साई रिसॉर्टप्रकरणी खोटे आरोप करून सोमय्यांनी बदनामी केली. नाक घासून माफी मागितली नाही तर 100 कोटींचा दावा करणार असा इशारा अनिल परब यांनी दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 29, 2023, 08:41 PM IST
नाक घासून माफी मागा नाही तर...  अनिल परब यांचा किरिट सोमय्या यांना इशारा title=

Anil Parab On Kirit Somaiya:  साई रिसॉर्ट कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर हे घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नाक घासून माफी मागा... असं म्हणत अनिल परब यांनी किरिट सोमय्या यांना गंभीर इशारा दिला आहे. 

सोमय्या यांचे आरोप काय?

अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. रिसॉर्टवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. 

100 कोटींचा दावा

किरीट सोमय्या यांनी नाक घासून माफी मागावी नाहीतर 100 कोटींचा दावा द्यावा लागेल असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. साई रिसॉर्टप्रकरणातले सर्व आरोप खोटे होते. तेव्हा हायकोर्टातलीही सर्व प्रकरणं सोमय्यांना मागे घ्यावी लागतील असा दावाही अनिल परब यांनी केला आहे. 

अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. सोमय्या यांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याचा दावा परबांनी केला होता.  गेल्या आठवड्यात परबांनी सोमय्यांना माफी मागण्याबाबत नोटीस पाठवली होती.

साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नाही

ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परबांना ईडीकडून मोठा दिलासा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नसल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात सदानंद कदम, जयराम देशपांडेंवर आरोप निश्चित झाले आहेत. दरम्यान दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं दखल घेतली आहे.  दोन हजार पानांचं पहिलं आरोपपत्र ईडीनं सादर केलं. यात तुर्तास अनिल परब यांना मुंबई हायकोर्टानं 12 जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.