Maharashtra Politics : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 7 जूनला राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. झी 24 तासला सूत्रांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार? शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मंत्रिपद मिळू शकतं. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांचं मंत्रीपदाचं स्वप्न साकार होऊ शकतं. भाजप आणि शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार, अद्याप गुलदस्त्यात आहे.
मंत्रिपदाचा फॉर्म्युला आधीच ठरला असल्याचे समजते. मंत्रिपदाच्या संधीसाठी परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत झाल्याचीही माहिती आहे. विभागीय निकषांसोबतच मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती याचाही विचार करून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. दीड पावणे दोन वर्षातच लोकसभा निवडणूक येत आहे. त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे कमी कालावधीत तगदा परफॉर्मन्स मंत्र्यांना दाखवावा लागणार आहे.
नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, मात्र यांना सात महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार चिमटा काढला होता. शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तृत्ववान नाहीत का ? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थितीत केला. हिंगोलीतल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यादिवसी सरकार पडेल याच भितीमुळे मंत्रीमंडळ विस्तार होत नाही असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाल्यावर आता भाजपमध्येही इच्छुकांची रांग लागलीय. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. पक्षादेश आला तर लोकसभा नक्कीच लढवू असं ते म्हणाले. निवडणूक लागल्यास पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं ते म्हणाले.