राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित लवकरच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 27, 2018, 11:34 PM IST
राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे... title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे लवकरच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. कारण तशी मागणी मनसेतून करण्यात आलेय. अमित यांच्याकडे जबाबदारी देण्याची मागणी आहे. तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरेंना राजकीय आखाड्यात उतरविण्याची शिफारस मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे मनसेच्या आगामी कार्यक्रमांमध्ये अमित ठाकरे व्यासपीठावर दिसू शकतात. 

मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणूक लढवण्यास मनसेचे नेते अनुकूल आहेत. मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे नेते आणि सरचिटणीस उपस्थित होते. आगामी निवडणुकांची व्यूहरचना ठरवणं आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबत पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मनसे नेते आणि पदाधिकारी ही निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल असल्याचे या बैठकीतून समोर आलंय. 

छाया - अमित ठाकरे फेसबुक पेज

मनसे करणार युती?

मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे हे घेणार आहेत. याबाबत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका होतील अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीय. तसंच राज ठाकरे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असून आगामी निवडणुकांमध्ये कुणाशी युती होणार हे काळच ठरवेल असंही नांदगावकर म्हणालेत.  आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात. याशिवाय जळगावमधील १२ मनसे नगरसेवक फुटीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं नांदगावकरांनी सांगितलंय. ते सर्व नगरसेवक दीड वर्षांपासून पक्षाच्या संपर्कात नसल्याचंही ते म्हणालेत. 

मनसेची बैठक वादळी

मुंबईत झालेली आजची मनसेची बैठक चांगलीच वादळी ठरली. सातत्यानं मनसे अपयशी ठरत असल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांना फैलावर घेण्याऐवजी नेत्यांनीच राज ठाकरेंना थेट अनेक सवाल केले. पक्षाला लागलेल्या गळतीपासून ते अमित ठाकरेंच्या राजकारणाच्या प्रवेशापर्यंत अशा अनेक मुद्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी राज ठाकरेंची खडाजंगी झाली. केवळ मराठीच्या मुद्यावर सत्तेत येणं कठीण असल्याचं बाळा नांदगावकरांनी बोलून दाखवलं. तर मराठीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरत असल्याचं खापर राज ठाकरेंनी नेत्यांवर फोडलं.