अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली. 

Updated: Jun 18, 2017, 01:59 PM IST
अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? title=
छाया सौजन्य : राजेश वराडकर

मुंबई : मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली. 

भाजपनं यावेळी राष्ट्रपतीपदासाठी कुणाच्याही नावाचा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला नाही. NDA मधील बहुतांश घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. शिवसेनेनेही या भूमिकेला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.

मात्र शिवसेनेनं त्याला स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळतेय. आधी नाव जाहीर करा मग भूमिका मांडू अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून समजतंय. 

अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही अमित शाह यांच्यासोबत होते. मातोश्रीमधल्या वरच्या मजल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक घेतली गेली. सुमारे सव्वा तासभर ही बैठक चालली.

 

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती, सूत्रांकडून मिळतेय. शेतक-यांसंदर्भात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीनंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे मातोश्रीहून पुढल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.