अंकुर त्यागी, झी मीडिया, मुंबई : सुट्टीच्या काळात देशांतर्गत फिरण्यासाठी जाण्याची योजना आखत असाल तर सावधान. तुम्हाला एकतर बसने प्रवास करावा लागेल किंवा विमानाने, कारण रेल्वेची तिकीटं केव्हाच फुल झाली आहेत.काही दलालांनी ही तिकीटं परदेशी आयपी अॅड्रेसच्या माध्यातून बुक केली आहेत. ती तिकीटं आता महागड्या दराने तुम्हाला ब्लॅकने विकली जातील. उन्हाळी सुट्टीसाठी कुठे फिरायला जाणार असाल तर सावधान. रेल्वेचं आरक्षणच उपलब्ध नाही, आणि रेल्वेची तिकीटं हवी असतील, तर ती काळ्याबाजारात उपलब्ध आहेत, आरक्षण खिडकीवर नाहीत काऊंटर व्ही २ या सॉफ्टवेअरचा सर्व्हर मध्य रेल्वेने उघड केला आहे.
तिकीटांचा काळाबाजर रोखण्यासाठी मध्य रेल्वेने दलालांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. त्यामुळे हैराण झालेल्या दलालांनी आता परदेशी आयपी अॅड्रेस वापरत रेल्वेची फसवणूक सुरू केलीय. व्ही ३ सॉफ्टवेअरसाठी अवघे १०० रूपये भरून एकावेळी ६० पीएनआर आरक्षित करायला दलालांनी सुरूवात केलीय. रेल्वे आरक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला तिकीट मिळत नाही. मग दलालांकडून दुप्पट तिप्पट दराने तिकीट घेणे, बसने प्रवास करणे किंवा महागडा विमानप्रवास करणे हे पर्याय तुमच्या हाती उरतात.
मात्र यातल्या तज्ज्ञांच्या मते हे नवं नाही. व्ही २ काऊंटर खूप आधीपासूनच वापरला जातोय. आत्ता उघड झालेलं हे व्ही २ काऊंटरचं नवं व्हर्जन आहे. याशिवाय अशी धूळफेक करणारी अनेक सॉफ्टवेअर दलालांच्या वापरात आहेत. दलालांना या व्हर्जनचा पासवर्ड अवघ्या १०० रूपयांत विकला जातोय.
मध्य रेल्वे आरपीएफच्या माहितीनुसार मुंबईमध्ये जो सर्व्हर पकडला गेला त्यात ६६०० पीएनआर होते. या सर्व पीएनआरचं विश्लेषण तातडीने करणं शक्य नाही. मात्र मुंबईबाहेर किंवा राज्याबाहेर बसून मुंबईची तिकीटं बुक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तिथल्या विभागीय अधिका-यांची मदत घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया मोठी वेळखाऊ असणार आहे. यातूनच दलालांनी तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी केलेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात येईल.