मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वेत चढता-उतरताना एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर रेल्वेला त्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय सुनावलाय. रेल्वे प्रवाशांच्या निष्काळजीपणाचं कारण पुढे करत रेल्वे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करू शकत नाही. 'इकोनॉमिक टाइम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती ए के गोयल आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठानं, रेल्वेत चढताना किंवा उतरताना एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे.
रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 124 ए नुसार, एखाद्या प्रवाशानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेत तो गंभीर जखमी झाला किंवा त्याचा जीव गेला तर अशा प्रसंगी रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
रेल्वे अपघाताच्या घटनांमुळे निर्माण झालेला वाद संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. यानुसार, रेल्वे प्रशासन पीडित प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार राहील.