मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून ती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.  

Updated: Mar 15, 2019, 07:55 PM IST
मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल title=

मुंबई : सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग गुरूवारी कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेनं रस्त्यावर कोसळलेल्या पुलाचे अवशेष तातडीने हलवले. तसंच पुलाचा धोकादायक स्लॅब देखील जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आला. या दुर्घटनेनंतर जे. जे. पुलाची उत्तर वाहीनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. उत्तरेकडे जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद तर दक्षिणेकडून येणारी वाहतूक एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्याकडून मेट्रोच्या दिशेने वळवण्यात आली आहे. उत्तरेकडे जाण्यासाठी मोहम्मद अली रोड, पी डीमेलो रोड आणि मरीन ड्राईव्हचा पर्यायी मार्ग आहे. सीएसएमटीवरून दादरकडे जाणाऱ्या गाड्यांना महापालिका मार्गावरून मेट्रो जंक्शन आणि तिथून मोहम्मद अली मार्गाने दादरकडे वळवण्यात आली आहे. 

दरम्यान, मुंबईतील सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर निवृत्त प्रमुख अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपप्रमुख अभियंता आर. बी. तरे यांचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

प्राथमिकदृष्ट्या स्ट्रक्चरल ऑडिट योग्य करण्यात आले नाही, असं दिसून येते आहे. निष्काळजीपणे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते, असा ठपका ठेवण्यात आहे. डी. डी. देसाई असोशियटसने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. तसेच डी. डी. देसाई असोशियटस अँड कन्स्टलटंटने शहर भागातील ३९ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल चांगला असल्याचा शेरा दिला होता. मात्र, आठ महिन्यात हा पूल कोसळला आणि यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ लोक या दुर्घटनेत जखमी झालेत. अद्याप काही जण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.