आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट

मराठी माणसाला खरंतर जे राज आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे, ते या दोघांचे चिरंजीव अमित आणि आदित्य यांना करणं सहज शक्य झालंय. 

Updated: Sep 17, 2017, 05:24 PM IST
आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट  title=

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मराठी माणसाला खरंतर जे राज आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे, ते या दोघांचे चिरंजीव अमित आणि आदित्य यांना करणं सहज शक्य झालंय. मुंबईतल्या लोअर परळमधल्या सेंट रिजिस, पलेडियम या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ठाकरेंची चौथी पिढी अमित आणि आदित्य एकमेकांना भेटले.

रात्री अकरा ते साडेबारा अशा तब्बल दीड तास चाललेल्या या भेटीत दोघांनी एकत्र जेवण घेतलं आणि अगदी दिलखुलास गप्पाही मारल्या. या भेटीत कुठलंही राजकारण नव्हतं, ना कसला आड पडदा. सगळं कसं हलकंफुलकं आणि मोकळं ढाकळ. या भेटीसाठी या दोघांना एकत्र आणणारा दुवा ठरला तो त्यांचं फुटबॉलप्रेम.

ठाकरे घराण्याची ही युवा पिढी फुटबॉल खेळाची आणि त्यातल्या जागतिक कीर्तीच्या प्लेयर्सची नि:स्सीम चाहाती आहे. सध्या मुंबईत फुटबॉल फिवर सुरू आहे. प्रीमियर लीग फुटसाल या आंतराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांसाठी रोनाल्दीनो, रायन गिग्स, डेको हे आणि अनेक जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू सध्या मुंबईत दाखल झाले आहेत.

अमित ठाकरे हे या स्पर्धा आयोजनात पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांचा संघही या स्पर्धेत सहभागी झालाय. अमितप्रमाणे आदित्य यांनाही फुटबॉलमध्ये विशेष रुची आहे. ते मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री आदित्य फुटबॉलपटूंचा मुक्काम असलेल्या पलेडियम हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी आले होते. तिथेच आदित्य आणि अमित यांची भेट आणि गप्पा झाल्या. आणि या निमित्तानं राज-उद्धव यांनी पुन्हा एकत्र यावं अशी भोळी अपेक्षा बाळगून असलेल्यांच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या.