महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या लोखंडी कढईतून धोकादायक प्रवास; दृष्य पाहून अंगावर काटा येईल

Latur News :  प्रशासकीय अनास्था किती टोकाची असू शकते, हे दाखवणारी अशी ही बातमी आहे. वर्षानुवर्ष नदीवर पुल होत नसल्याने लातुरच्या गुंजरगा गावचे शेतकरी चक्क कढईतून प्रवास करत आहेत. समस्येकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी कुणीचं लक्ष देत नसल्याने शेतकरी आता हतबल झालेत. नेमका हा कढईचा प्रवास काय आणि कसा आहे, 

वनिता कांबळे | Updated: Dec 21, 2024, 09:13 PM IST
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या लोखंडी कढईतून धोकादायक प्रवास; दृष्य पाहून अंगावर काटा येईल title=

Maharashtra News : मोठ्या लोखंडी कढईतून प्रवास...  हे काही कसलं जलपर्यटन नाहीये तर गुंजरगा इथल्या शेतकऱ्यांचा हा रोजचा प्रवास आहे. निलंग्यातील तेरणा नदीवर पुल नसल्यानं गावकरी शेतात जायला हा धोकादायक प्रवास करतात. मोठ्या लोखंडी कढईतून जीव मुठीत घेऊन रोज ये-जा करतायेत. असा प्रवास करणारं एकच शेतक-याचं कुटुंब नाहीये तर जवळपास 20 ते 25 शेतकरी कुटुंबाला हा त्रास आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी किमान लोखंडी पूल करून पायवाट करून द्यावी अशी मागणी ग्रामसभेत अनेकवेळा केली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पायपीट करूनही कोणताच तोडगा निघाला नाही. निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर असलेल्या गुंजरगा येथील शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडच्या तीरालगत आहे. मात्र, नदीला पाणी असल्यामुळे गावाच्या लोकांनी लोखंडाची कढई तयार करून त्यातून आपल्या शेताकडे ये-जा करावी लागते. त्यातच शेतात झालेला शेतमाल गावाकडे घेऊन येण्यासाठी दळणवळणाची कसलीही सोय नाही. अन्नधान्याची पोती कढईतून आणणे शक्य नाही म्हणून घरासाठी लागणारे जेमतेम अन्नधान्य खांद्यावर घेऊन कढईतून प्रवास करून घराकडे घेऊन येतात. उर्वरित शेतमाल परस्पर निलंगा, औराद, लातूर याठिकाणी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या भावात शेतमाल विकून मिळेल तेवढे पैसे पदरात पाडून घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही होते. 

संपूर्ण भारतात कडधान्य, डाळी तेलबियांसाठी लातूर जिल्हा प्रसिद्ध आहे. हे पिकवणारे शेतकरी मात्र मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. कित्येक वर्षांची पुलाची मागणी अजुनही पुर्ण होत नाही. आता एखाद्या अनुचित घटनेपुर्वी प्रशासन जागं होणारच नाही का, असा उद्विग्न सवाल विचारला जातोय.

एकविसाव्या शतकाकडे धावणाऱ्या व जगात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशात मात्र लातूर जिल्ह्यात आजही शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पाण्यातून कढईमध्ये बसून जावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतमाल घरी आणता येत नसल्याने अधिकचा खर्च करुन इतरत्र बाजारपेठेत न्यावा लागत आहे. ही व्यथा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची असून, पर्यायी पूल किंवा व्यवस्था प्रशासनाने करुन देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.