मुंबई : अशोक चव्हाण काँग्रेस संपवतायत अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर राणेंनी झी 24 तासशी संवाद साधताना अशोक चव्हाणांवर जोरदार तोंडसुख घेतलंय.
हा निर्णय घेताना आपल्याला विचारण्यात आलं नसल्याचा दावा राणेंनी केलाय. काँग्रेस संपवणा-यांनाच आपण संपवू असा निर्धार राणेंनी केलाय. अजूनही आपण काँग्रेसमध्येच असून नवरात्रीमध्ये भूमिका स्पष्ट करु असं राणेंनी स्पष्ट केलंय.
राणेंच्या या जोरदार प्रहारानंतर आम्ही अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी यावर नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिलीय.
नारायण राणे यांना काँग्रेसने जोरदार दणका दिला. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणी पक्षाने बरखास्त केली आहे. विकास सावंत यांची नुतन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेय. त्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत वाद उफाळला आहे.
पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा काँग्रेस कार्यकारणी, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र तथा भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत.