भावोजींना बाप्पा पुन्हा पावला! सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर फेरनियुक्ती

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांना गणपती बाप्पा पुन्हा पावला आहे. 

Updated: Jul 24, 2020, 08:33 PM IST
भावोजींना बाप्पा पुन्हा पावला! सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर फेरनियुक्ती title=

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांना गणपती बाप्पा पुन्हा पावला आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदावर आदेश बांदेकर यांनी फेरनियुक्ती झाली आहे. शुक्रवार २४ जुलै २०२० पासून पुढच्या तीन वर्षांकरता आदेश बांदेकर यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश बांदेकर यांच्या या पदाला राज्यमंत्री पदाचाही दर्जा आहे. 

आदेश बांदेकर यांचा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज संपत होता. त्याआधीच त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. २०१७ साली फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या कोट्यातून आदेश बांदेकर यांची या पदावर पहिल्यांदा नियुक्ती झाली होती. 

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून संकटाच्या काळात देशाला आणि राज्याला आर्थिक मदत केली. कोरोनाच्या संकटातही ट्रस्टने त्यांची तिजोरी उघडली आहे. कोरनाच्या आधीही मंदिर ट्रस्टकडून गरजू रुग्णांच्या उपचारांचा खर्च केला जात होता. 

१६ वर्ष सतत होम मिनिस्टरच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. २००९ साली आदेश बांदेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेनेच्या जवळपास सगळ्याच प्रमुख कार्यक्रमात आदेश बांदेकरच सूत्रसंचलन करतात.