CORONA UPDATE - 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल

Updated: Jun 29, 2021, 04:22 PM IST
CORONA UPDATE - 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक? title=

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत चालला आहे. त्याआधीच तिसऱ्या लाटेचा धोका वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल कारण साधारण 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले असल्याची शक्यता टाटा मुलभूत संशोधन संस्था अर्थात TIFR च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीये. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल असा अंदाज या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. मात्र, या अभ्यासात दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या रुग्णांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा करोना होणं हा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव होऊन आता दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. अशात ज्यांना पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे त्यांच्यातील अँटिबॉडिज आता कमी झाले असतील, हे लक्षात घेता अशांना तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं TIFR च्या अभ्यासात म्हटलं आहे. ज्यांना पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे अशा नागरिकांना तिसऱ्या लाटेपासून दूर कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवं आहे, तसंच ज्यांना अजून कोरोनाची लागण झालेली नाही, अशा 20 टक्के लोकांचं संपूर्ण लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरजही या TIFR च्या अभ्यासात नमुद करण्यात आलीय. 

या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलं आहे?

- करोनाच्या तिसऱ्या लाटेवर तीन घटक परिणाम करणारे ठरतील
- नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी ठरेल
- राज्यातले ६० टक्क्यांहून अधिक निर्बंध उठवणे 
- कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन

साधारण सप्टेंबरमध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल. पण त्याआधी नवा कोणताही व्हेरिएंट आला नाही, तसंच जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकऱण झालं, आणि लस 75 ते 95 टक्के प्रभावी ठरली तर तिसऱ्या लाटेचा धोका आणि तीव्रता कमी होऊ शकतो असंही या अभ्यासात म्हटलं आहे.