विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'

Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

राजीव कासले | Updated: Jul 4, 2024, 10:38 PM IST
विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार' title=

Manoj Jarange Exclusive : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. हा मुद्दा किती कळीचा आहे याची जाणीव सर्व पक्षांना झाली. आगामी विधानसभा निवडणुकीतही (Maharashtra Assembly Election) हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा हाच मुद्दा घेऊन दौरा करणार आहेत. 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मुदत दिली आहे. तो पर्यंत तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला आपला झटका दाखवू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विधानसभेसाठी संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

'मराठा समाज ताकद दाखवणार'
जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही ताकदीने एकजुटीने पुन्हा मराठा समाज आपली ताकद दाखवणार आहे. आम्ही 288 जागांवर उमेदवार उभे करणार, 13 जुलैनंतर निर्णय घेणार, बैठक घेऊन 288 पाडायचे की निवडून आणायचे याच्यावर निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे बैठक घेऊन ठरवणार आणि एकदा ठरलं की त्या मतावर आम्ही ठाम राहू असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. पावर गोर-गरीबांच्या हातात राहायला हवी, समाजाला विचारुन निर्णय घेण्यात येईल. पाडण्याची ताकद आणि निवडून आणायची ताकद मराठा समाजात आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. 

सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम
सरकारने एक महिन्याची वेळ वाढवून मागितली होती, ती मुदत आम्ही मोठ्या मनाने दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या वाख्येप्रमाणे व्हायला हवी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. याशिवाय आठ ते नऊ मागण्या आहेत, त्यावरही सरकारबरोबर चर्चा झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी रॅली
आपल्या दौऱ्याला ओबीसी समाजाने (OBC) विरोध करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीत कायद्याने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे.  आम्ही मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती रॅली सहा जुलैपासून सुरु करणार आहोत. तेरा जुलैपर्यंत ही रॅली शांतेत काढली जाणार आहे. राजकीय स्वार्थासाठी विरोध करायचा ही सवय लागली आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीय. तुमच्या लेकराला जसं आरक्षण मिळतंय, तसं आमच्याही लेकराला मिळावी ही आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.

छगन भुजबळांवर गंभीर आरोप
सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.गावागावात तेढ निर्माण करण्याचं काम फक्त भुजबळांनी केलंय. आम्ही जिथे सभा घेतो तिथे सभा घ्यायची गरज काय?
भुजबळांनी जातीयवाद पसरवण्याचं काम केलंय ते त्यांनाच बंद करावं लागणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. भुजबळांचा विचार मराठा विरोधी आणि द्वेषाने भरलेला आहे. आंतरवालीच्या आंदोलनाची परवानगी भुजबळांच्या माध्यमातूनच नाकारली, भुजबळांना सरकार गप्प बसवत नाही तोवर ते गप्प बसणार नाहीत, भुजबळांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत असा गंभीर आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केलाय.

गावपातळीवर कटुतेची जबाबदारी कोणाची?
गावपातळीवर निर्माण झालेल्या कटुतेचा आंदोलनाशी काहीही संबंध नाही, त्यांना इतकं का वाईट वाटायला लागलं आहे. मराठ्यांनी त्यांच्या मुलांसाठी आरक्षण मागितलं आहे. मागासिद्धसुद्धा आहेद, ते गरीब आहेत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक निकषातही ते बसतायत, गावपातळीवर दुकानांवर जाऊ नका असं म्हणण्याची गरज काय आहे, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला आहे. जातीय द्वेष का पसरवला जातोय. 25 वर्षा मराठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहिला त्या मराठा समाजाविरोधात तुम्ही इतके द्वेषाने का वागायला लागलात असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला आहे. जातीयवाद पसरवण्याचं काम छगन भुजबळने केल्याचा गंभीर आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण समजून घ्या अशी विनंती यावेळी जरांगे पाटील यांनी धनगर बांधवांना आणि ओबीसी बांधवांना केली.