धक्कादायक! ३ दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण

बाळाला आपल्या मातेसह कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रूग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं

Updated: Apr 2, 2020, 08:28 AM IST
धक्कादायक! ३ दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरसची लागण जसलोकमधील सात नर्सना झाल्याची माहिती समोर आली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेंबुरमधील महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात गेली असताना त्या महिलेला आणि तिच्या अवघ्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.

२६ मार्च रोजी प्रसुतीकरता या महिलेला एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसुती झाल्यानंतर या बाळाला आपल्या मातेसह कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रूग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर या नर्सिंग होममधील रिसेप्शनिस्टला देखील कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

त्या बाळाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी दुपारी ११.३० च्या सुमारास त्यांच्या पत्नीचं सिझेरिअन करण्यात आलं. बाळासह माझ्या पत्नीला १२.३० वाजता एका खासगी रूममध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर दुपारी २ वाजता एक नर्स आली आणि त्यांनी हा खासगी रूम खाली करायचा सांगून त्यांना दुसरीकडे ठेवलं. ज्या नर्सने हे सगळं सांगितलं त्या स्वतः कस्तुरबा रूग्णालयात क्वारंटाइन असल्याची धक्कादायक माहिती नंतर समोर आली.

त्यानंतर त्यांना कोणतीही माहिती न देता दुसऱ्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. तब्बल २४ तासांनी डॉक्टरांनी त्यांना फोन करून माहिती दिली की,'तो खासगी रूम कोरोनाच्या पेशंटसाठी ठेवण्यात आला होता. आता कोणताही डॉक्टर किंवा नर्स त्या रूममध्ये येणार नाही.' महत्वाची बाब म्हणजे या नर्सिंग होमने ६५ हजार रुपये चार्ज केले होते.

 

बाळाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार,'रूग्णालयात येण्यापूर्वी माझ्या पत्नीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. आता पत्नीसह माझ्या बाळाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. याला जबाबदार कोण? '