Mumbai Local वर 14 तासांचा मेगाब्लॉक; घराबाहेर जाण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा

Mega Block : पश्चिम रेल्वेवर तब्बल 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 3, 2023, 10:59 AM IST
Mumbai Local वर 14 तासांचा मेगाब्लॉक; घराबाहेर जाण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा title=
(फोटो सौजन्य - PTI)

Mega Block : विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो (Mumbai News) घराबाहेर पडताना पर्यायी मार्गाचा विचार करुनच बाहेर पडा. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना या मेगा ब्लॉकचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर तब्बल 14 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर, तर ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे 

कुठे- ठाणे- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी 10. 40 ते दुपारी 3.40 पर्यंत

या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल ठाणे आणि कल्याणा स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या त्यांच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने स्टेशनवर पोहोचतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या  दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे 

कुठे - ठाणे – वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

परिणाम -

ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 04.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाणे स्टेशनसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर 14 तासांचा  जम्बो ब्लॉक

कधी आणि कुठे - पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम - या ब्लॉकदरम्यान, अंधेरी आणि गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार असून तेथूनच चर्चगेटकरता चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल / एक्स्प्रेस 10 ते 15  मिनिटे उशिराने धावतील. तसेच राम मंदिर स्थानकावर अप आणि डाऊनला कोणतीही लोकल उपलब्ध नसणार आहे.