ऑस्ट्रेलियाचा नवोदित फलंदाज सॅम कोन्स्टान्सने पुन्हा एकदा आपण फक्त आपल्या फलंदाजीतून भाष्य करणार नसल्याचा हेतू दाखवला आहे. सि़डनीत (Sydney Test) सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी सॅम कोन्स्टान्स (Sam Konstans) त्याचा संबंध नसलेल्या वादात उडी मारुन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहशी (Jasprit Bumrah) भिडला. या वादानंतर जसप्रीत बुमराहने सॅम कोन्स्टान्सच्या सोबतीने आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या उस्मान ख्वाजाला (Usman Khwala) माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आक्रमक सेलिब्रेशन केलं, ज्यामध्ये विराट कोहलीनेही (Virat Kohli) उडी घेतली.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूर हा वाद झाला. उस्मान ख्वाजा यावेळी फलंदाजी करत होता. यावेळी तो फलंदाजीला तयार होण्यासाठी जास्त वेळ घेत होता. यामुळे गोलंदाजी करणाऱा बुमराह नाराज झाला. त्याने हातवारे करत आपली नाराजी जाहीर केली. पण यावेळी काही संबंध नसताना सॅम कोन्स्टान्सने उडी मारली आणि बुमराहला काही शब्द बोलला. यामुळे बुमराह चिडला आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.
पण पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. के एल राहुलने स्लीपला उस्मान ख्वाजाचा जबरदस्त झेल घेतला.
विकेट घेतल्यानंतर जसप्रीत बुमराह उस्मान ख्वाजाच्या ऐवजी सॅमच्या दिशेने वळला आणि आक्रमकपणे सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. या सेलिब्रेशनमध्ये विराट कोहली सहभागी नसता झाला असता तर आश्चर्यच वाटलं असतं. विराट कोहली स्लीपमधून धावत सॅमच्या दिशेने गेला आणि सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली.
दरम्यान भारतीय फलंदाजांनी या सामन्यातही निराशा केली. भारतीय संघ फक्त 185 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमरहाने फलंदाजी करताना 22 धावा केल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. विराट कोहलीने मात्र पुन्हा एकदा निराशा केली. विराट कोहली फक्त 17 धावा करुन तंबूत परतला.
दरम्यान रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भारतीय संघ 185 धावांवर सर्वबाद झाला असून, ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलैंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही गमावणार आहे.