संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, कोर्टाकडून नियमित जामीन मंजूर

'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. नामपल्ली कोर्टाने अभिनेत्याला नियमित जामीन मंजूर केला आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 3, 2025, 06:26 PM IST
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, कोर्टाकडून नियमित जामीन मंजूर title=

Allu Arjun Gets Bail: हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सुपरस्टार अल्लू अर्जुनला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नामपल्ली कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात अभिनेत्यावर आरोप करण्यात आले होते. आता त्याला जामीन मंजूर झाला आहे. 

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी आज नामपल्ली कोर्टात सुनावणी झाली. ज्यामध्ये न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यासोबतच अभिनेता अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन अटींचा भाग म्हणून प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय घडलं? 

'पुष्पा 2' हा चित्रपटाचा प्रीमियर शो हा 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पार पडला होता. हा शो संध्या थिएटरमध्ये पार पडला होता. यावेळी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा फर्स्ट डे फस्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी काही लोक नाचत होते तर काही ढोल वाजवत होते. अनेकजण फटाके फोडतानाही दिसले. दरम्यान, अल्लू अर्जुन स्क्रीनिंगला येणार असल्याचे ऐकून चाहत्यांनी येथे गर्दी केली होती. यावेळी येथे गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि 14 डिसेंबर रोजी त्याची हैदराबाद तुरुंगातून सुटका झाली. 

अल्लू अर्जुनवर कोणते आरोप? 

4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन प्रीमियर शो साठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आणि आवश्यक व्यवस्थेच्या अभावामुळे महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा यामध्ये जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला असल्याचं या तक्रारीमध्ये म्हटले आहे. 

'पुष्पा 2' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरु आहे.