प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : मुंबईचं ट्राफिक आणि सौंदर्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapti Sambhaji Maharaj) नावानं ओळखला जाणार आहे. शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर (Raigad Fort) शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde Fadanvis Government) याची घोषणा केली. शिंदेंच्या या घोषणेमुळे एकीकडे शिवप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय तर दुसरीकडे एका वेगळ्याच राजकारणाची चर्चा सुरु झालीय.. कोस्टल रोडला बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray) नाव द्यायची तयारी झालेली असताना अचानक छत्रपती संभाजीराजेंचं नाव का देण्यात आलं अशी ही चर्चा आहे..
शिवसेनेला काय हवंय?
कोस्टल रोड हा आदित्य (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातो. त्यामुळेच कोस्टल रोडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची इच्छा शिवसैनिकांची होती. मात्र तसा लेखी प्रस्ताव मुंबई महापालिकेत देण्यात आला नाही. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव कोस्टल रोडला देण्याची घोषणा हवेतच विरली. आता मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजीमहाराजांचं नाव देण्याची घोषणा केली
म्हणून कोस्टल रोडला नाव
मुंबई कोस्टल रोड हे ठाकरेंचं स्वप्न आहे. त्यामुळेच बाळासाहेबांचं नाव देण्यात येईल असा अंदाज होता. मात्र शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजीमहाराजांचं नाव देण्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेला नेमकं हवंय काय अशी चर्चा सुरु झालीय. अर्थात शिंदे-फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव दिल्यामुळेच कोस्टल रोडला छत्रपती संभाजीमहाराजांचं नाव देण्यात आल्याचाही एक सूर उमटतोय.
कसा आहे कोस्टल रोड?
कोस्टल रोड हा मुंबईच्या वाहतूकीवर तोडगा असल्याचं बोललं जातं. समुद्रकिनाऱ्याच्या साथीनं जाणाऱ्या या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट आणि मस्त होणार आहे. तब्बल चौदा हजार कोटींचा हा प्रकल्प मरिन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीटपासून सुरु होऊन पुढे प्रस्तावित वांद्रे ते वर्सोवा बोरीवली या सागरी सेतूला जाऊन मिळेल. मध्ये हा मार्ग गिरगाव चौपाटीजवळ जमिनीखालील बोगद्यातून मलबार हिलवर बाहेर पडेल. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत.
मरीन लाईन्स ते कांदिवली या 29 किलोमीटरच्या मार्गावर 18 एन्ट्री आणि एक्झिट पॉईण्ट असणार आहेत. आठ मार्गिकांचा हा प्रकल्प असणार आहे. त्यातल्या दोन मार्गिका बससाठी राखीव असणार आहेत. दोन टप्प्यांमध्ये कोस्टल रोड बांधला जाणार आहे. मरीन लाईन्स ते वरळी पर्यंतच्या टप्प्याचं काम आधी केलं जाईल. कोस्टल रोडमुळे चर्चगेट ते बोरीवली या मार्गावरची वाहतुकीची कोंडी आणि प्रवासाला लागणारा वेळ दोन्ही कमी होणार आहे.