यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..

Ladki Bahin Yojana :  यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.   

राजीव कासले | Updated: Aug 24, 2024, 04:24 PM IST
यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच.. title=

Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला. महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यक्रमाला आलेल्या काही महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समोर आलं आहे. आपल्याला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे यात अडचणी येत आहेत. या तक्रारी महिलांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण त्यांना महिला पोलिसांनी रोखलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच या महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

कोण होत्या त्या महिला?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घालणाऱ्या या महिला यवतमाळमधल्या दिग्रस पारधी बेड्यावरच्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील या महिला आहेत. महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार भावना गवळी गोंधळ घालणाऱ्या महिलांकडे पोहोचले आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पोलिसांनी अन्याच केल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावेळी कुणी कितीही मोठा पोलीस असेल, अन्याय केला तर त्याच्यावर कारवाई करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

'आमच्या सर्व बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे'
लाडकी बहिण योजनेबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे, असं म्हटलं. या योजनेमुळे विरोधक पागल झाले आहेत, त्यांना काय करायचं ते कळत नाहीए, तुमचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. तुमचे सर्व अहवाल आमच्याकडे आहेत असा हल्लाबोल यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधाकांवर केला. काळे कारनामे करणाऱ्यांच्या तोंडाला काळी पट्टीच बांधावी लागेल असा टोलाही बदलापूर प्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लगावला. या योजनेत खोडा घळणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. 

स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळमध्ये
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी आम्ही यवतमाळमध्ये आल्याचं सांगितलं. लाडकी बहिण योजना बंद करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले. मविआ  सत्तेत आली तर लाडकी बहीण, उज्वला सारख्या योजना बंद करतील, पण ज्यांच्या मागे ताई त्याचं कुणीही काही बिघडवू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही लाडकी बहीण योजना पण देऊ आणि सुरक्षाही देऊ, एकाही महिला मुली मुलाच्या विरोधात अपराध होत असेल तर पेटून उठले पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. 

एकेका शाळेत जा, मुलींना विचारा, जो अपराध करीत असेल तर त्याला सोडणार नाही, अशा घटनांकडे समाज म्हणून पहावे लागेल, मुलांना संस्कार द्यावे लागतील, आम्ही ते संस्कार शाळेपासून देऊ, असं सागंत फडणवीस यांनी अशा घटनेचा राजकारण करणे हे असंवेदनशील आहे, संवेदनाहीन आहे असं म्हटलंय. संवेदनशील बाबीवर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज असल्याचं त्यांनी आवाहन केलं.