उर्वशी खोना, नवी दिल्ली
शरद पवारांच्या (Sharad Pawar) 85व्या वाढदिवसाला अजित पवारांनी (Ajit Pawar) पॅचअपचं गिफ्ट दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आणि शरद पवारांच्या नात्यात कटुता आली होती. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी नात्यात ऑलवेल असल्याचा संदेश दिला आहे. अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी पवारांची भेट घेऊन एकत्रिकरणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे.
शरद पवारांचा दिल्लीत साजरा झालेला वाढदिवस त्यांच्यासाठी खास असाच ठरला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार काका पुतण्यांमध्ये वितुष्ट आलं होतं. पण अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांना शुभेच्छा देऊन नात्यातली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवारांनी रिटायर व्हावं अशी जाहीर भूमिका घेतली होती.
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या वयाच्या मुद्याला शरद पवारांनीही जशास तसं उत्तर दिलं. आता तर नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे सांगून शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेतली हवा काढली. शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार बाहेरच्या असल्याचं म्हटल्यावरुनही काका पुतण्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. पवार कुटुंब फुटल्यावरुन अजित पवार भावनिक झाले. त्यांच्या भावनिक होण्याची शरद पवारांनी जाहीर नक्कल केली.
दोघांमध्ये सुसंवाद निर्माण होईल की नाही याबाबत शंका असताना अचानक नात्यातला ओलावा पुन्हा जागृत झाला आहे. शरद पवारांच्या दिल्लीतल्या वाढदिवसाला अजित पवारांनी सहकुटुंब हजेरी लावली. शरद पवारांचे अजित पवारांनी आशीर्वाद घेतले.
राजकीय विचार वेगवेगळे असले तरी कुटुंब एक असल्याचं आमदार रोहित पवारांनी सांगितलं आहे. आजोबांना भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पार्थ पवारांनी सांगितलं. पवार कुटुंबांच्या एकत्रिकरणाचा निर्णय दोघं नेते बसून घेतील असं युगेंद्र पवारांनी सांगितलं आहे.
पवार कुटुंबाच्या या मनोमिलनाचा अध्याय सुरु झाला आहे. पवार कुटुंबातील कटुता या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी संपेल का? अजित पवारांच्या पुढाकारानंतर कटुता संपवण्यासाठी शरद पवार कोणतं पाऊल उचलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.