बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीडच्या सगळ्या राजकीय लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बीडचा बिहार झाल्याचा आरोप या खुनाच्या निमित्तानं करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं मराठवाडा हादरुन गेला आहे. पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून देखमुख यांची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचा आरोप होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी या प्रकरणात बीड पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापनेची मागणी केली आहे.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर संतोष देशमुखांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. तिथल्या लोकांनी या प्रकरणात थेट वाल्मिक कराड यांचं कनेक्शन असल्याचा आरोप केल्याचा दावा क्षीरसागरांनी केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी बीडमध्ये गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला आहे. वाल्मिक कराड कायद्याला मानत नसल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.
पंकजा मुंडेंनी या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी फडणवीसांकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. सरपंच हत्या प्रकरणाचा सूत्रधार कोणीही असला तरी फडणवीस त्यांना सोडणार नाही असं भाजपनं ठणकावून सांगितलं आहे.
ज्या वाल्मिक कराडांवर या प्रकरणावर आरोप होऊ लागलेत ते वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे अतिशय विश्वासू असल्याचं सांगण्यात येत आहे. धनंजय मुंडे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासूनचे सोबती आहेत. परळीतल्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत वाल्मिक कराडांचा सहभाग असतो. धनंजय मुंडेंच्या 2019 आणि 2024च्या निवडणुकीची जबाबदारी वाल्मिक कराडांवर होती. परळी नगर परिषदेत गटनेते म्हणून कराड यांनी काम पाहिलंय. वैद्यनाथ साखर कारखान्याचे ते संचालक आहेत.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. या प्रकरणावरुन बीडची नाहक बदनामी करु नका अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलीय. बीड जिल्ह्यातल्या या राजकीय हत्येचा मास्टरमाईंड समोर आला तरच गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.