Weather Update : राज्याच्या 'या' भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये जिथं बर्फाची चादर पाहायला मिळते, तिथं यंदाच्या वर्षी परिस्थिती विदारक. पाहा हवामान वृत्त   

सायली पाटील | Updated: Jan 9, 2024, 07:32 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु  title=
Weather Update Central Maharashtra konkan to get heavy rainfall latest updates

Weather Update : ऐन थंडीचा कडाका वाढण्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात मात्र अवकाळीची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाले असून, ऋतूचक्राला शह देत भलतीच स्थिती आता राज्यात पाहायला मिळणार आहे. याच अंदाजानुसार मंगळवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येही पावसाचे ढग पाहायला मिळाले. 

दरम्यान येत्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर,  पुणे, सातारा जालना या जिल्ह्यांनाही पुढच्या 24 तासांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, राज्यावर अवकाळीचं संकट उभं राहिल्याचं आता अधिक स्पष्ट झालं आहे. 

कोकणालाही झोडपलं... 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळनंतर अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली वैभववाडी भागातही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागातील रस्त्यांवर पाणी साचलं, तर काही भागांमध्ये या अवकाळी पावसामुळे आंबा काजू बागायतदार धास्तावले. सध्या अवकाळी मुळे आंबा- काजू पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.  

हेसुद्धा वाचा : बिअर बारसमोर 'आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे' फलक लावणं बंधनकारक, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

 

सध्या लक्षद्वीप (Lakshdweep) बेटांजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती कायम असून त्यामुळं त्यापासून (Gujrat) गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आता विरून गेला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्राच मात्र पुढील काही दिवसांसाठी पावसाला पोषक हवामान पाहायला मिळत आहे. 

उत्तर भारतात थंडीचा लपंडाव 

देशाच्या उत्तरेकडे (North India) सध्या थंडीचा लपंडाव पाहायला मिळत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात (Rajasthan, MP) तापमानात बरीच घट नोंदवण्यासआली असून, अलवर येथील तापमान 3 अंशांवर पोहोचलं आहे. उर्वरित भागांमध्ये हा आकडा 14 अंशांच्या घरात आहे. राजस्थानमध्ये थंडीचा हा कडाका पुढील काही दिवस कायम राहणार आहे. 

तिथं हाडं गोठवणाऱ्या थंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये मात्र यंदा थंडीचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. सोनमर्ग आणि गुलमर्ग येथे असणारी बर्फाची चादर आता विरळ होऊ लागली आहे. तर, सध्या काश्मीरमध्ये (Kashmir) आभाळ निरभ्र असल्यामुळं इथं सूर्यकिरणं थेट भूपृष्ठावर पोहोचत असून, त्यामुळं किमान तापमानात वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला काश्मीरच्या खोऱ्यातील काही गावं वगळता अनेक ठिकाणी तापमान 5 ते 4 अंशांदरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.