ठाण्यात पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. 

Updated: Dec 6, 2018, 11:36 PM IST
ठाण्यात पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार title=
संग्रहित छाया

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. 

धरणात अपुरा पाणीसाठा

धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.

ठाणे शहराला स्टेम, एमआयडीसी, मुंबई पालिका आणि भातसा धरणातून दररोज ४८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. बारवी धरणातील पाण्याचे नियोजन करताना एमआयडीसीने १४ टक्के कपात लागू केली आहे. तर, पालिकेच्या स्टेम योजनेतूनही तेवढीच पाणीकपात सुरू झाली आहे. त्यामुळे निम्म्याहून जास्त शहराला एक दिवस पाणी कपात आणि दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. आता भातसाच्या पाण्यावरही कपात लागू झाल्याने उर्वरित ठाणेकरांनाही एक दिवस पाणी मिळणार नाही.