वाशिमच्या शिक्षकाचा अनोखा छंद, मधुमक्षिका पालनाचा केला भन्नाट प्रयोग

वाशिमच्या शिक्षकाने नोकरी सांभाळत मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय यशस्वी करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. 

Updated: May 21, 2022, 09:32 PM IST
 वाशिमच्या शिक्षकाचा अनोखा छंद, मधुमक्षिका पालनाचा केला भन्नाट प्रयोग title=

वाशिम - निसर्ग चक्रात मधमाश्यांना अनन्य साधारण महत्व आहे. झाडांच्या परागिकरणाची महत्वपूर्ण प्रक्रिया ही मधमाश्या मार्फतच होते. मात्र शेतीमध्ये वाढत्या कीटक नाशकांच्या फवारण्या आणि घातक रसायनांचा वापर यामुळे मधमाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी निसर्गचक्र खंडित होऊन अन्न निर्मिती थांबू शकते आणि याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागू शकतात.  यामुळेच मधमाशी संवर्धन ही काळाची गरज बनली आहे हे राजू जोगदंड या शिक्षकाने हेरले.  नेमक्या याच उद्देशाने प्रेरीत होऊन वाशीम येथील राजु जोगदंड यांनी आपली शिक्षकाची नोकरी सांभाळुन मधुमक्षिका पालन सुरू केले आहे. त्यांनी शंभर मधमाशी पेटयांपासुन सुरू केलेला जिल्हयातील पहिला मधुमक्षिका पालनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.  "ज्या दिवशी मधमाश्या या जगातून नष्ट होतील, त्यानंतर केवळ चार वर्षांतच जग नष्ट होइल" सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अलबर्ट आईस्टाईन यांच्या या वाक्याने प्रेरित होऊन राजू जोगदंड यांनी कंबर कसली.

शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा व्यवसाय केल्यास त्यांना शेतीला उत्तम जोडधंदा मिळेल. तसेच शेती उत्पादनातही वाढ होईल आणि पर्यावरण संवर्धनासाठीही त्याचा मोठा हातभार लागेल असे राजू जोगदंड सांगतात. मधमाशी पालनाच्या व्यवसायातून राजू जोगदंड यांनी मागील वर्षात तब्बल २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. विविध पिकांमध्ये परागीकरणासाठी शेतकऱ्यांना पेट्या भाड्याने देणे, नवीन पेट्यांची निर्मिती करणे, मध विक्री तसेच मधावर प्रक्रिया करण्याच्या माध्यमातून लाखो रूपयांचा नफा जोगदंड यांनी कमावला आहे.

तरुणांनी मधमाशी पालनाकडे वळावे यासाठी राजू जोगदंड विविध गावात जाऊन त्यांना मोफत मार्गदर्शन करतात. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षिण शिबिरातही प्रशिक्षक म्हणून ते भाग घेतात. शाळेत विध्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे देताना जोगदंड गुरुजींनी अध्यापनाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे.  मधुमक्षिका पालनाच्या यशस्वी प्रयोगातुन राजू जोगदंड यांनी जिल्हयातील शेतकऱ्यांना नवा आदर्श घालून दिला आहे.

गणेश मोहळे, वाशिम, झी न्यूज