मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतल्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपने चौघांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी २-२ उमेदवार दिले होते आणि शिवसेना २ उमेदवार रिंगणात उतरवणार होती. त्यामुळे या १० जणांना ९ जागांसाठी निवडणूक लढवावी लागली असती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आग्रही होती. पण काँग्रेस मात्र २ जागांवर ठाम होती. काँग्रेस जर दुसरा उमेदवार देत नसेल, तर आपणच निवडणुकीला उभे राहत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं. शिवसेनेकडून ही बातमी लिक झाल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी होती.
अखेर महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत तोडगा काढण्यात आला, त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
काँग्रेसने कालच २ उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे आता काँग्रेसचा कोणता उमेदवार माघार घेतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांना उमेदवारी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी घोषित केली, तर शिवसेनेनं उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत, पण याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची संधी दिली आहे. १४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.