मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकासआघाडीत सुरू असलेल्या नाराजीवरून भाजपने टीका केली आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता, निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात. भाजपलाही या निवडणुका बिनविरोध हव्या आहेत. निवडणुका बिनविरोध होणं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका,' अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सन्मान आणि राज्यातील परिस्थिती पाहता निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्यात! ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. आम्ही आमच्या मतांप्रमाणे उमेदवार दिले आहेत. काँग्रेस ऐकत नाही यावरून आघाडीत जो बेबनाव सुरु आहे त्यामधे आम्हाला ओढू नका!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2020
निवडणूक बिनविरोध करणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे, हा जावईशोध लावू नका, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या ४ उमेदवारांची घोषणा केली आहे. आमचं संख्याबळ बघूनच आम्ही ४ उमेदवार दिल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.
निवडणूका बिनविरोध करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी हा जावई शोध लावू नका...! pic.twitter.com/Vik2PngOym
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 10, 2020
विधानपरिषद निवडणुकीच्या ९ जागांसाठी महाविकासआघाडीत शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने २ आणि काँग्रेसने १ जागा लढवावी, असा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. पण काँग्रेस २ जागा लढवण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शिवसेना-राष्ट्रवादीची मागणी आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्यांच्या प्रत्येकी २-२ उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेस जर २ जागा लढवणार असेल, तर आपण निवडणूक लढणार नाही, असा इशाारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांना दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्याची बातमी शिवसेना नेत्यांकडून लिक करण्यात आल्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. शिवसेना नेत्यांनी ही बातमी माध्यमांना दिल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
भाजप- प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील
काँग्रेस- बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड
राष्ट्रवादी काँग्रेस- शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी
विधानपरिषदेसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित केलं असलं, तरी याची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपने या चौघांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
१४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर २१ मे रोजी विधानपरिषदेसाठी निवडणूक होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार करण्यासाठी विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.