विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : राखी म्हणजे नात्यांचा सण, भावानं बहिणीनं दिलेला रक्षणाचा वचन, हेच वचन निभावत असतांना पर्यावरण रक्षणाचा संदेश औरंगाबादमध्ये देण्यात आला आहे. राखीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन केलं जातं आहे.
राखीच्या सणांत राख्यांचे नानाविध प्रकार बाजारात पाहायला मिळतात. मात्र औरंगाबादच्या गार्गी भाले यांनी अनोखी राखी बनवली. जी केवळ रक्षाबंधनच नाही तर वर्षानुवर्षापर्यंत भाऊ-बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत राहणार आहे. कारण गार्गी यांनी तयार केलेल्या राखीवर करंजासह विविध वृक्षांच्या बिया आहेत. सण साजरा झाल्यानंतर त्या बियांचे रोपण करून पर्यावरण समृद्धीचे काम होणार आहे.
राख्यांवरील बिया मातीत रुजवता येतात. तसेच या राख्यांच्या पॅकिंगसाठीदेखील पळसाच्या पानांचा वापर करण्यात आला. अशा या पर्यावरणपूरक राख्या अत्यल्प दरात त्यांनी बनवल्या. सध्या या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे. यासाठी त्यांनी राखीवर करंज आणि बहावा या झाडांच्या बियांचा वापर केला आहे.
ही अनोखी राखी खरेदी करताना वेगळाच आनंद मिळत असल्याचे ग्राहक सांगत आहेत.
सण साजरे करतांना निर्सगाचं भान राखणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. गार्गीसारख्या महिला सण साजरं करताना निसर्गाचं भानही ठेवतात. त्यांचा हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय म्हणावा लागेल.