मुंबई : Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला आणि समुद्र किनारी भागात जोरदार फटका बसला आहे.रत्नागिरी शहरातील समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना याचा चांगला तडाखा बसलेला आहे. वादळाने अनेक झाडाच्या फांद्या ,नारळाच्या फांद्या घरावर पडून नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेलेले आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जोरदार वादळात तुटलेल्या वीज वाहिनीचा मोठा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.
Tauktae चक्रीवादळामुळे तुटून रस्त्यावर पडलेल्या 33 के.व्ही. क्षमतेच्या वीज तारेचा शॉक बसून खेड तालुक्यातील बोरज येथील पती पत्नीचा दूर्देवी मृत्यू झाला आहे. ही दूर्घटना काल सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बोरज खेड जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.बोरज घोसाळकरवाडी येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना प्रकाश घोसाळकर हे दोघे दुचाकीने लोटे येथे गेले होते. आपले काम करुन ते घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
जिल्ह्यात Tauktae वादळ होऊन गेले असतानाही अद्यापही काही भाग अंधारात आहे. रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील पऱ्याची आळी तसेच राम आळी आणि आठवडा बाजार या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरवासियांना अंधारात राहावे लागले आहे. दरम्यान, महावितरण विभागाने हा वीजपुरवठा सुरळीत करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी तसेच भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वादळामुळे रत्नागिरीतील वीज पुरवठा रविवारी दुपारपासूनच खंडित करण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी वीज नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात अनेक ग्रामीण भागात दोन दिवस झाले तरी विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून ग्रामीण भाग अंधारात आहे. तसेच समुद्र किनारी भागात वादळाने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.