येत्या २४ तासात 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार

पुढच्या २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 29, 2017, 09:26 AM IST
येत्या २४ तासात 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार  title=

मुंबई : रविवारपासून मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला असून गेल्या २४ तासांत ७० टक्के पावसाची नोंद झाली. पुढच्या २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४०० मि.मी. अधिक पाऊस झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

मध्य रेल्वेवर परिणाम

गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर झालेला दिसून येत आहे. सोमवारी १५ ते २० मिनिटांच्या उशिराने लोकल धावत होत्या. पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. पूर्व उपनगरासह दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरींमुळे सोमवारी मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. सखल भागात पाणी साचल्याने लोकल १५ ते २० मिनिटांच्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्य़ांना दुपारी गर्दी होती. पश्चिम रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेनुसार धावत असल्याचे सांगण्यात आले. 

बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत असून पुढे गुजरात आणि डहाणूच्या दिशेने वेगाने जात आहे. त्यामुळे मुंबईत कुलाब्यापासून पुढे दक्षिण मुंबई, उपनगरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडला. येत्या २४ तासांतही हीच परिस्थिती राहणार असल्याचे स्कायमेटचे संचालक महेश पलावत यांनी सांगितले. 

कुठे कशी स्थिती ?

रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील बहाद्दुर शेख पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु, वशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढल्याने वाहतूक बंद होती.

नाशिक

नाशिक शहरात संततधार पावसामुळे धरणांमधला विसर्ग वाढवला, गोदावरी, दारणासह उपनद्यांना पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबई

वसई, विरार आणि मिरा-भाईंदर शहरांमध्ये सकाळपासून संततधार सुरूच आहे. २४ तासात मुसळधार कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पालघर

धामणी धरण १०० टक्के भरल्याने पाचही दरवाजे उघडले, सूर्या नदीद्वारे १८ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु, सूर्या आणि वैतरणाला दुधडी भरून वाहू लागल्या.

पंढरपूर

 उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रायगड

अनेक भागात पावसाची दमदार हजेरी, खोपोली, महाड, पेण, उरण, अलिबाग, रोहा परिसरात रात्रभर संततधार, जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. 

पुणे

पुण्यातील इंदापूर आणि परिसरात रात्रीपासून रिमझिम सुरुच आहे.