Mumbai Goa Highway : मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग असे अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत. यांचे काम वेगाने सुरु आहे. तर, दुसरी महाराष्ट्रातील मुंबई-गोवा हायवेचे काम तब्बल 12 वर्षापासून रखडलयं. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची राजकारण्यांनी दिलेली घोषणा आता जुनी झाली आहे. कोकणातून जाणारा मुंबई-गोवा हायवे गेल्या 12 वर्षांपासून तयार झालेला नाही. सहा पूलांची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त झाले आहेत. कोकणवासीयांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र कामाचा वेग खूपच कमी आहे. कामाची गती पाहता या मार्गावरील अनेक पुलांची कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव, लोणेरे आणि टेमपाले इथल्या प्रमुख पुलांची कामं रखडलेली आहेत. त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त आहेत. 12 वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेलं हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल,अशी महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. कंत्राटदारांनी पळपुटी भूमिका घेतल्यानं महामार्ग रखडलाय,असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. महामार्ग रखडण्यासाठी एकाच सरकाला जबाबदार धरता येणार नाही,असं सामंत यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले होते.
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बाजार पेठेत वाहतूक कोंडी कायम आहे. पर्यायी मार्गाचं काम रखडल्यामुळे ही समस्या उद्धभवलीये. या समस्येमुळे स्थानिक नागरीक, व्यावसायिक तसंच वाहनचालक त्रस्त झालेत. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होताना माणगाव बाजार पेठेला पर्याय म्हणून शहराबाहेरून रस्ता काढण्यात आलाय. याचा माणगावकरांना फटका बसलाय.