मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने ९ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुणे, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसह कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
नवी मुंबईतही काल चांगला पाऊस झाला तर दोन दिवसानंतर रायगड जिल्ह्यात काल पुन्हा विजांच्या कडकडाटासह काही भागात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लावली होती. रायगड जिल्ह्यातील दोन-तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र काल जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव , खोपोली, पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा आल्याने दिलासा मिळाला. मात्र. अचानक पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर बुधवारी रात्री झालेल्या पावसाने पुणे शहराची अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या पावसात एकाचा बळी देखील गेला. त्यामुळे पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा पुढे आला. आता पावसाने आणखी दोन दिवसांचा मुक्काम वाढवल्याने पुणेकर धास्तावले आहेत.
दरम्यान, परतीच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. सायंकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. येत्या दोन दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम भागातील अनेक भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
आधीच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाचा तडाखा बसत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. तसेच सांगलीतही जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक रस्ते पाणाखाली होते. सांगलीतील कवठेमहांकाळ आणि तासगांवच्या दुष्काळी भागात अतिवृष्टी झाल्याने त्याचा फटका शेतीला बसला. तसेच अग्रणी नदीला पूर आला. दरम्यान, पुरात जीव धोक्यात घालून पुलावरून जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. पाण्याच्या प्रवाहात त्याची मोटारसायकल गेली वाहून. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. परतीच्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला होता.