केंद्र सरकारच्या आपूर्ती योजनेत खरेदी केलेला ३३ टक्के कांदा सडला

देशात किरकोळ बाजारात कांदा दीडशे रुपये किलो

Updated: Dec 5, 2019, 04:09 PM IST
केंद्र सरकारच्या आपूर्ती योजनेत खरेदी केलेला ३३ टक्के कांदा सडला title=

नाशिक : एकीकडे कांद्याच्या दराने डोळ्यांत पाणी आणलंय तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या आपूर्ति योजनेत खरेदी केलेला ३३ टक्के कांदा पूर्णपणे सडला आहे तर इतर १५ टक्के कांद्याचा दर्जा घसरला आहे. देशात किरकोळ बाजारात कांद्यानं दीडशे रुपये किलोचा भाव ओलांडला आहे.. त्यामुळे सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे. गेल्या पाच एक वर्षात कधी नव्हे तो कांदा आता सरकारच्याही डोळ्यात पाणी आणतोय असं म्हटलंय तर वावगं ठरु नये. सरकार कांद्याचे भाव नियंत्रणात राहावे यासाठी प्रयत्न करत आहे.

उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याने रेकॉर्ड ब्रेक केला. उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल १४ हजार ५५१ रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. या मोसमातील हा भाव सर्वात जास्त मानला जात आहे.  कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात आला असल्याने आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

कांद्याच्या वाढत्या दरावरून राजधानी दिल्लीतलं राजकारण ही तापलं आहे. काँग्रेसनं कांदा दरवाढीवरून केंद्र सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केलाय. त्यासाठी काँग्रेसनं संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लोकसभेतल्या विधानाचाही निषेध करण्यात आला. आपण कांदा खात नाही त्यामुळे आपला कांद्याशी संबंध नसल्याचं वादग्रस्त विधान निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या दरवाढीच्या चर्चेदरम्यान केलं होतं. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी चांगलीच टीका केली.