पुणे : फी किती द्यायची हे डॉक्टरांनी नाही तर, रुग्णांची ठरवायचं. एव्हढच नाही तर, रुग्णांनी फी देखील त्यांना जमेल तेव्हढीच द्यायची. अगदी नाही दिली तरी चालेल. कट प्रॅक्टिसच्या जमान्यात पुण्यातील एक डॉक्टर चक्क अशा पद्धतीने दवाखाना चालवत आहेत. डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या रुपातील हा देव माणूस.
पुण्यातल्या सदाशिव पेठेतील डॉ. रघुनाथ गोडबोलेंचा दवाखाना आहे. दवाखान्यात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला एक बोर्ड दिसतो. रुग्णांनी ऐच्छिक फी द्यावी. किती द्यावी, की देऊ नये यावर काही बंधन नाही. ती सर्वस्वी रुग्णांची इच्छा.
गोडबोले सर पोट विकाराचे तज्ज्ञ. त्यांची प्रॅक्टीस आहे तब्बल ३३ वर्षांची. एव्हढा अनुभव आणि हातगुण असलेले डॉक्टर तेव्हढीच दांडगी फी घेतात. गोडबोले सरांच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं आहे. अनुभव दांडगा. हातगुण कसा आहे हे तर रुग्णांची गर्दी सांगतेय. पण फी मात्र ऐच्छिक.
गोडबोले डॉक्टर मागील साडे आठ वर्षांपासून ही मोफत रुग्णसेवा देत आहेत. पण त्याची पायाभरणी १९८४ सालीच झाली होती. तेंव्हापासून ते गरजू रुग्णांना फी मध्ये उपचारात सवलत देत आले आहेत. २००९ला त्यांच्या प्रॅक्टीसला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी त्यांनी सरसकट सर्वच रुग्णांसाठी फी ऐच्छिक करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून त्यात काहीही बदल नाही.
गोडबोले सरांच्या दवाखान्यात रुग्णांसाठी जसा ऐच्छिक फी चा बोर्ड आहे तसाच एमआर म्हणजे मेडीकल रिप्रेझेंटीटीव्हसाठी देखील आहे. एमआर कडून कुठलही भेट घेणार नाही, असा हा बोर्ड आहे.
ट्रेकींग आणि माऊटेनेरिंग हा गोडबोले सरांचा छंद आहे. शेकडो वेळा ते हीमालयात गेले आहेत. त्यामुळे वयाच्या ६१ मध्ये देखील ते एकदम फीट आहेत. त्यामुळे वयाच्या ७५ पर्यंत अशीच मोफत रुग्णसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.