तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, संतप्त कार्यकर्ते मातोश्रीवर

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका.

Updated: Jan 11, 2020, 02:25 PM IST
तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, संतप्त कार्यकर्ते मातोश्रीवर title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेत उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपसोबत हात मिळवणी केली. या ठिकाणी महाविकासआघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणे आवश्यक असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले राणा पाटील यांच्या गटाला साथ देत भाजपचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद आपल्या पुतण्याला मिळवून दिले. यावेळी त्यांनी पक्षहित बाजुला सारले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद महाविकासआघाडीच्या हातातून निसटली. त्यामुळे तानाजी सावंत यांची उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी करा, अशी थेट मागणी होऊ लागली आहे.

तानाजी सावंत यांची बंडखोरी

दरम्यान, उमरगा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी राणा पाटील म्हणजेच भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात स्वतःच्या पदरात उपाध्यक्ष पद मिळवले. त्यामुळे राणाजगदिशसिंग पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का देण्याचे काम शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी केले. तानाजी सावंत यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात तानाजी सावंत हे शिवसेनेविरोधात असेच वागत राहतील, त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणार्‍या शिवसैनिकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक सुरु आहे. बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीनंतर तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी होणार का, याची उत्सुकता शिवसैनिकांना आहे.