कोल्हापूर : महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani shetkari sanghatna) महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज याची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक इथल्या राज्य कार्यकारणी बैठकीत राजू शेट्टींनी ही घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
'सर्वच पक्षाकडून समान वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवन्यात महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. वेळोवेळी आमच्या भूमिका ह्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल म्हणूनच बदलल्या असं ही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.'
राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमधून बाहेर पडणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी आज याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सरकारवर नाराज होते.
'आमचे एकमेव आमदार आमच्या संपर्कात नाहीत, त्याची आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेन हाकालपट्टी केली. आम्ही काय करणार याची बरीच चर्चा सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्ता काय करणार. यांच्याकडे जाणार का त्याच्याकडे जाणार याची चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन व्हावी म्हणून आम्ही खारीचा वाटा उचलला होता. कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे 1 मे रोजी गाव सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाव ठराव करून घ्यायचा आहे.'
'गावातल्या शेतकऱ्यांच्या मागणीवर संसदेत ठराव करायला भाग पाडू. मूलभूत अधिकार म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी देखील गाव सभेत ठराव घ्या. गावागावात जाऊन हुंकार यात्रा काढली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उपेक्षतीत नागरिकांना उध्दवस्त केले.'
'एनडीएला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला तर घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की एक स्वच्छ सरकार पाहिजे, काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे म्हणून आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही मोदी यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात हे विचारलं होतं, त्यावेळी मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं बोलले होते.' असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.'
'स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार असं आश्वासन दिलं तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल असं म्हणाले होते. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला. राज्यातील सत्तेतील तिन्ही पक्षाची राज्यात एक भूमिका आणि केंद्रात एक भूमिका आहे. भूमीअधिग्रहण कायद्यावरून राज्यातील सत्तेत असणाऱ्या पक्षाची भूमिका दुपट्टी आहे.'