नोकरीच्या नावाखाली तरुणींची फसवणूक, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून धक्कादायक माहिती समोर आली आहे...

Updated: Apr 5, 2022, 05:24 PM IST
नोकरीच्या नावाखाली तरुणींची फसवणूक, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नोकरी देणाच्या निमित्ताने तरुणींची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. 
 
तरुणींना कॅटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिसाला नेऊन त्यांच्यामार्फत अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नागपूरमध्ये झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणींचा लैंगिक छळ आणि त्यांना मारहाण केल्याचंही उघड झालं आहे.

आतापर्यंत एकूण सहा तरुणींचा या टोळीने अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी वापर केल्याचं चौकशीतून समोर आलं असून या तरुणींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचंही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. 

अभिषेक पांडे कॅटरिंग आणि इव्हेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गांजासह इतर अंमली पदार्थांची ओडिसातून तस्करी करायचा. यासाठी तो मुलींना नागपूरहून ओडीसाला घेऊन जात असे. ओडीसातून निघताना तो मुलींच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ ठेवत असे आणि नागपूरसह राज्यात त्याची विक्री केली जात होती. 

अभिषेक पांडे आणि दत्तू खाटिक या आणखी एका आरोपीदरम्यान वाद झाल्यानंतर त्यांच्या वादाची ऑडिओ क्लिप मोबाईलवर व्हायरल झाली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आलं.