दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता २५ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महाविकासआघाडी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही एकत्र लढवण्याची तयारी या तिनही पक्षाकडून होत आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे. या समितीमध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि विनायक राऊत, काँग्रेसकडून मोहन जोशी, कल्याण काळे आणि राष्ट्रवादीकडून शिवाजी गर्जे असणार आहेत.
३० डिसेंबर ते ५ जानेवारी रोजी जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार आहेत. तीनही पक्ष एकत्र आले तर २५ पैकी २२ जिल्हा परिषदांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता येणार आहे. सध्या तेरा ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
याआधीच अजित पवार यांनी देखील याबाबत वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात याआधीच बैठक झाली होती. अजित पवार यांनी म्हटलं होतं की, महाविकासआघाडी एकत्र लढणार की नाही हे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं.