कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना-भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये (Bjp vs Shiv Sena) तुफान राडा झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. यामुळे मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. हा सर्व प्रकार नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवास्यात (Newasa) घडला आहे. पूल उद्घाटनाच्या श्रेयवादावरुन कार्याकर्ते भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. (shiv sena and bjp activists clash over to bridge inauguration credit at pachegaon ahmednagar)
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदीवर नव्याने पूल बांधण्यात आलाय. या पुलाच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरुन दोन्ही गट आमने सामने आले. यावेळेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणी विद्यमान आमदार गडाख गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. भाजपची सत्ता असताना तत्कालीन आमदार मुरकुटे यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध केला होता. मात्र पुलाचे काम आम्हीच पुर्ण केलं, असा दावा करत माजी मंत्री शंकरराव गडाख समर्थकांनी करत पुलाचं उद्घाटन ठेवलं होतं.
याचा निषेध करत माजी आमदार मुरकुटे समर्थकांनी उद्घाटनस्थळी घोषणाबाजी केली. प्रातिनिधीक स्वरूपात नारळ फोडून उद्घाटन केले. याचवेळी गडाख समर्थक माजी आमदारांच्या अंगावर धावून आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.