सोनू भिडे, नाशिक-
भारतीय नागरिक १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत होते. तर 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कझाकिस्तानमधील नूर सुलतान येथे “आयर्नमॅन” स्पर्धेत (Iron Man Competition) नाशिकचे अनेक जण आपल्या देशाचे नाव उज्वल करण्यासाठी धडपडत होते. अखेर याच स्पर्धेत नाशिक मधील १९ जणांनी कझाकीस्तानमध्ये आयर्न मॅन स्पर्धा जिंकून तिरंगा फडकवला आहे. या स्पर्धकांमध्ये पोलीस दलातील अश्विनी देवरे यांचा सहभाग आहे. त्यांना पहिल्या महिला पोलीस “आयर्नवुमनचा” किताब मिळाला आहे.
कशी आहे आयर्नमॅन स्पर्धा
आयर्नमॅन स्पर्धा हि वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन द्वारे आयोजित केली जाते. अतिशय खडतर असलेली ट्रायथलॉन स्पर्धा प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धक पूर्ण करतात. स्पर्धा १६ तासात पूर्ण करावी लागते यात 3.8 किमी पोहणे, 42 किमी धावणे आणि 180 किमी सायकलिंगचा समावेश आहे. या स्पर्धेला संपूर्ण जगातून स्पर्धक येत असतात. या स्पर्धेदरम्यान कोणताही ब्रेक दिला जात नाही. वातावरणात कोणतेही बदल झाले तरीही अनुकूल परिस्थितीत स्पर्धा पूर्ण करावी लागते.
नाशिकच्या नावे अनेक विक्रम (Record)
जागतिक स्तरावर शारीरिक क्षमता जोखण्याच्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकच्या (Nashik) १९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली आहे. एकाचवेळी एकाच शहरातील १९ स्पर्धकांनी सहभाग घेणे आणि त्यात विजय मिळविणे हा जागतिक विक्रम असल्याच म्हटलं जात आहे. यात नाशिक मधील पिता पुत्रांचा समावेश आहे. प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले या तीन स्पर्धकांनी विजयाची हॅट्ट्रिक मिळविली आहे. या स्पर्धकांमध्ये डॉ. देविका पाटील, पोलीस नाईक अश्विनी देवरे आणि नीता नारंग या महिलांचा सुद्धा सहभाग आहे. तर पोलीस दलातील पहिली महिला आयर्नवुमन हा किताब नाशिक पोलीस आयुक्तालयातील अश्विनी देवरे यांनी पटकावला आहे. या सर्व विक्रमांमुळे नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.