नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. नाशिककडे जाताना घोटी गावाजवळ शेताच्या बांधावर जात शरद पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शरद पवार नाशिककडे रवाना झाले.
'आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही', अशी व्यथा या शेतकऱ्यांनी आपल्याजवळ व्यक्त केल्याचंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं या शेतकऱ्यांनी सांगितलं. pic.twitter.com/TUtQ1a76rJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 1, 2019
जिल्ह्यातील तब्बल तीन लाख हेक्टरहून अधिक म्हणजेच जवळपास निम्म्या क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये लेट खरीप कांदा, मका, द्राक्ष, सोयाबीनचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या १ हजार ६१४ गावांमधले ४ लाख ५२ हजार ९३१ शेतकरी बाधीत झाले आहेत.
एकीकडे, शिवसेना-भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना राष्ट्रवादीनं मात्र 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय. दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळतेय. शिवसेना पुढे आली तर 'सोबत' नाहीतर शिवसेने'शिवाय' भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.