'फडणवीस CM असतानाही..'; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On Maratha Reservation Bill: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयाबद्दल शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 21, 2024, 09:57 AM IST
'फडणवीस CM असतानाही..'; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले title=
पत्रकारांशी बोलताना शरद पवारांचं विधान

Sharad Pawar On Maratha Reservation Bill: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' गटाचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या धोरणांवर टीका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्याने इंडिया आघाडीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना शरद पवारांनीही यावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातही सूचक विधान केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटपाबरोबरच लोकसभा निवडणुकींबद्दलही पवारांनी भाष्य केलं. 

पवारांचं सूचक विधान

राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण लागू झालं आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. काहींनी या आरक्षणाचं स्वागत केलं असलं तरी काहींनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणत शिंदे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी हा निर्णय म्हणजे गोरगरीब मराठ्यांची फसवणूक असल्याचं म्हटलंय. असं असतानाच आता शरद पवारांनाही या विधेयकावर सूचक विधान करताना हे मराठा आरक्षण टिकेल की नाही याबद्दल मनात शंका असल्याचं म्हटलं.

...म्हणून पाठिंबा दिला

"जे कायदेशीर सल्ला देतात त्यांच्याच मनात याबाबत (या निर्णयाबाबत) शंका आहे. माझ्या मनातही शंका आहे. हा (मराछा आरक्षणाचा) प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे पण काल जे विधेयक संमत झालं तर यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने संमत करत मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशाच पद्धतीनं आरक्षण देण्यात आलेलं. मात्र त्यानंतरही हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टीकलं नव्हतं," अशी आठवण शरद पवारांनी करु दिली. प्रश्न सुटत असतील तर विरोधासाठी विरोध नको या भूमिकेतून या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही. म्हणूनच हे विधेयक एकमताने मंजूर झाल्याचं पवारांनी सांगितलं.

नक्की वाचा >> 'कुटुंबापासून एकटं पडल्यासारखं वाटतंय' म्हणणाऱ्या अजित पवारांना नवा धक्का; 'या' व्यक्तीनंही सोडली साथ

बापट यांचा केला उल्लेख

शरद पवार यांनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानाचा संदर्भही पत्रकार परिषदेत दिला. 'घटनेचे जाणकार असलेल्या बापट यांनी काल एक विधान केलं होतं. हे आरक्षण टिकणं शक्य दिसत नाही, असं ते म्हणाले. बघुयात आता काय होतंय ते,' असं शरद पवार म्हणाले.