मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच मराठा आंदोलनाचा भडका उडाला- शरद पवार

शरद पवार यांनी काढलेल्या या पत्रकात देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

Updated: Jul 24, 2018, 09:26 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच मराठा आंदोलनाचा भडका उडाला- शरद पवार title=

नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. शरद पवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. शरद पवार यांनी काढलेल्या या पत्रकात देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडून घातपात करण्याचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचे सांगितले होते. याच कारणासाठी फडणवीसांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णयही घेतला होता. याशिवाय, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पंढरपुरात घातपाताचा कट असल्यासंदर्भात काही विधाने केली होती. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळेच परिस्थिती आणखी चिघळली. परिणामी मराठा आंदोलनाचा उद्रेक झाला, असे पवारांनी म्हटले.

हे आंदोलन शांत करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांशी तात्काळ संवाद साधावा, असेही पवारांनी सांगितले आहे. 

याशिवाय, पवारांनी तामिळनाडूतील आरक्षणाच्या सूत्राकडेही राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूत ७० टक्के आरक्षण आहे. याचा विचार झाला पाहिजे.

मराठा समाजातील उच्चशिक्षित तरुणांना याचा फरक पडत नाही. मात्र, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत शरद पवार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.