ठाणे : शहापूरच्या शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याच पत्नीलाच अटक करण्यात आली आहे. शैलेश निमसेंच्या हत्येसाठी बायकोनंच दीड लाखांची सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या खूनामुळे शहापूर आणि परिसर हादरुन गेला होता. या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत होते. हा खून राजकीय आहे का, या दिशेनं तपास सुरू असताना अचानक ट्विस्ट आला आणि समोर आलं एक धक्कादायक सत्य.
शैलेश निमसे यांची त्यांच्यात पत्नीने हत्या का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. खूनाचा संशय येऊ नये म्हणून राजकीय डाव आखण्यात आला. मात्र, सीसीटीव्हीच्या दृश्यामुळे पत्नीचा डाव उघड झालाय. दरम्यान, शैलेश निमसे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, असा पत्नीचा आरोप होता. तर दुसरीकडे आठवडाभरापूर्वी शैलेश यांनी त्यांच्या पत्नीला मालमत्तेच्या अधिकारातून बेदखल केलं होते आणि घटस्फोटांसंदर्भातल्या कागदपत्रांवर तिची जबरदस्तीनं सही घेतली होती, अशी माहिती पुढे येत आहे.
आपल्याला मालमत्तेतून बेदखल केल्याचा राग पत्नी साक्षीच्या डोक्यात होता, म्हणूनच तिनं एका नातेवाईकाची मदत घेत शैलेश यांचा काटा काढायचा ठरवले. त्यासाठी साक्षीनं मारेकऱ्यांना दीड लाख रुपयांची सुपारी दिली. मारेक-यांनी घरात येऊन शैलेशचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेय. त्यानंतर निमसे यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीतल्या डिक्कीत घालून देवचरी जंगलात अर्धवट जाळून टाकण्यात आला, अशी धक्कादायक माहिती पुढे आलेय.
शैलेश निमसेंच्या हत्येमागे राजकीय डाव असल्याचा बनाव करणयात आला होता. मात्र, पोलिसांनी खूनाचा उलगडा केलाय. २० एप्रिल रोजी शहापूरजवळचं देवचरीच्या जंगलात शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसेंचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळाला होता. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज होता. त्या दृष्टीनं पोलिसांची चक्रं फिरू लागली. पण एक धक्कादायक सत्य समोर आलं.
शैलेश निमसे यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी साक्षी निमसे हिनेच दिली होती. सुरुवातीला या खुनाचा तपास करताना पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. ही हत्या राजकीय असल्याचा दावा करत काही संशयित नावंही पोलिसांना सांगण्यात आली होती. परंतु अखेर सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या खुनाचा यशस्वी उलगडा केला.