गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले. स्थानिक नागरिकही जिथे पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी खडतर प्रवास करत, अडचणींवर मात करत या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचले ते 'झी मीडिया'. हे वास्तव आहे. भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात १-२ नव्हे तर तब्बल ३१हून अधिक नक्षली टीपले. हा भाग देशाला पहिल्यांदा आम्ही दाखविणार आहोत. प्रचंड कठीण, मात्र परिणामकारक आणि नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणाऱ्या या अभियानाचा Exclusive ग्राऊंड रिपोर्ट. (व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा)
गडचिरोलीच्या दूर्गम जंगलात नक्षलवादी आणि सी-६०जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. दीर्घकाळ गोळीबार झालाय. झी २४तासची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा नदीच्या पात्रात आणि कडेला चकमकीच्या खुणा स्पष्टपणे नजरेस पडल्या. या भागातील शेकडो झाडांवर गोळ्या लागल्याच्या खुणा अजून ताज्या होत्या. तर काही ठिकाणी रक्ताचे थारोळेही. अत्यंत खडतर परिस्थितीत राहून सी-६० कमांडोंनी नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. मोठ्या कमांडर्सच्या मुक्कामाची जागा, जेवण बनविण्याची जागा, स्नान आणि कपडे धुण्याची जागा आणि तळातील समूहाच्या इतर सदस्यांची जागा झी २४ तासच्या टीमला दिसली. या सर्वांशी संबंधित वस्तू चकमकीच्या कल्लोळात उधळून गेलेल्या स्पष्ट नजरेस पडल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदूर्गम भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरातील बोरिया जंगल क्षेत्रात जाण्यासाठी आम्ही निघालो. हे क्षेत्र अत्यंत दूर्गम असल्याची जाणीव पदोपदी होत होती. उत्तम डांबरी रस्त्यावर देखील एकटी-दुकटी वाहने नजरेस पडत होती. अगदी जेमतेम कापडं अंगावर असलेली आणि शहरी वातावरणाला बुजणारी आदिवासी माणसं आमच्या नजरेस पडली. ताडगावचा खरा थरार सुरू झाला तो या बांडे नदीच्या पुलापासून. देश आणि राज्यात चर्चा असलेल्या सफल नक्षलविरोधी अभियानाचा ग्राउंड रिपोर्ट सुरू झाला होता. नेमक्या याच भागातून बोरिया जंगलात अचूक अभियान राबविण्यासाठी नक्षलविरोधी पथकाचे जवान रवाना झाले होते.
क्षणाक्षणाला थरार जागविणाऱ्या या अभियानाची माहिती घेण्यासाठी आम्ही पोहोचलो थेट ताडगाव येथे. इथून सुमारे २५ किमी अंतरावर हे अभियान पूर्णत्वाला गेले. ताडगाव याच गावात आहे इथले पोलीस मदत केंद्र. आणि म्हणून इथल्या नागरिकांना सुरक्षेचा दिलासा. रोज आहे दहशतीशी सामना मात्र याही स्थितीत जगण्याची उमेद सर्वोच्च. इथले शिक्षक सांगतात इथल्या मुलांमध्ये गुणवत्ता आहे मात्र संधीअभावी ती मागे राहिले आहेत. ताजी चकमक झाल्यावरही इथली दैनंदिन जीवन जैसे थे आहे. या भागात सध्या सुरक्षा बंदोबस्त कडक आहे. अगदी तारांच्या वेटोळ्यांनी घेरलेल्या पोलीस ठाण्यालाही आज वेगळे महत्व प्राप्त आले आहे.
चौकशीचे सोपस्कार आटोपले. हो अगदी आम्हालाही पोलिसांनी सोडले नाही. त्यांची रुटीन प्रक्रिया आहे म्हणत त्यांनी आमच्या इकडे येण्यामागचे सत्य काढून घेतले. समाधान झाले आणि सुरू झाली आमची बोरिया जंगलाकडे वाटचाल. डांबरी रस्ता कधीतरी डांबर नशिबी आलेला आणि त्यावरून धावणारी गाडी जणू किर्र जंगलातून निघणारी पांढरी रेघ.एव्हाना आम्ही बोरिया जंगलात पोचले देखील. समोर काय वाढून ठेवले आहे याची जाणीवदेखील नव्हती. एका गर्द सावली देणा-या झाडाखाली वाहन सोडले आणि सुरू झाला सत्य शोधण्यामागचा जंगल तुडविणारा पायी प्रवास.
असे जग जिथे माणूस दिसत नाही मोबाइल रेंज ची चैन तर सोडा. कच्चा मार्ग सोडून आम्ही घनदाट जंगलात प्रवेश केला. सलग चौथ्या दिवशी जंगलात नक्षलविरोधी पथक जवानाची तैनाती कायम होती. डोक्यावर ४५ डिग्री तापमान. हातात एकच पिण्याच्या पाण्याची बॉटल आणि समोर विस्तीर्ण इंद्रावती नदी पात्र. ही नदी म्हणजे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्यांना विभागणारी जीवनवाहिनी. ती अशी खडकाळ, खंडित स्वरूपात वाहणारी आणि अजस्त्र प्रवाह असणारी. म्हणून नक्षली तळासाठी अनुकूल. एका अवाढव्य नदी पात्रात एकूण ९ मोठे प्रवाह. एक वाळूचा, दुसरा खडकांचा तिसरा तुफान प्रवाहाचा तर चौथा निसरड्या पाऊलवाटांचा. महाराष्ट्रात नक्षली कारवाया करून छत्तीसगडला पलायन करणे अथवा उलट अशी नक्षली कारवायांची मोडस ऑपरंडी. घनदाट जंगलाची कथा तर अशी की कुठून गोळी येईल आणि घात करेल यांचा नेम नाही. मजल दर मजल करत एक एक प्रवाह आणि त्यातील अडचणी वर मात करत प्रवास सुरु झाला.
हुश्श करत एका ठिकाणी थांबण्याची इच्छा झाली मात्र अचानक काही वर्दीधारी पुढे आले. अर्थात पोलीस जवान. एवढ्या दूर प्रचंड दुर्गम भागात पोहोचलेली मीडिया टीम पाहून त्यांना आश्चर्य वाटले. विचारपूस झाली आणि पुन्हा एकदा पुढे जाण्याची परवानगी मिळाली. हे पोलीस पथक स्वतःसाठी स्वयंपाक बनविण्याच्या तयारीत होते आणि ज्यांना आपण शूरवीराची उपमा देतो प्रत्यक्षात त्यांचे जंगलातली वास्तव्य किती कठीण आहे याचा नमुनाच आम्हाला बघायला मिळाला. आता या सत्यशोधन प्रवासातील सर्वात कठीण अडचण पुढे आली. कंबरेएवढे पाणी असलेले पात्र कसे ओलांडायचे असा प्रश्न होता. चक्क पॅन्ट काढून, बूम आणि कॅमेरा डोक्यावर घेत पात्र ओलांडले. असे किमान पाच वेळा झाले.
सुमारे दोन तास रणरणते ऊन डोक्यावर घेत नदीची ९ पात्र पार करत शेवटच्या टोकाला पोचतो असे वाटत असतांनाच डोक्यावर घिरट्या घालणा-या चॉपरचा आवाज आला. आसपास २० किमी पर्यंत कुणीही नाही आणि वर चॉपर हा थरकाप उडविणारा प्रसंग होता. मात्र ऑपरेशनच्या चौथ्या दिवशी देखील महाराष्ट्र पोलीस सजगतेने जल-जमीन-आकाश यावर नजर ठेवून असल्याचे पाहून अभिमान वाटला. आणि अखेर आम्ही पोचलो इंद्रावती नदीच्या दुसऱ्या काठावर.
आणि याच ठिकाणी एक ठिकाणी उंचावर असलेल्या जागेवर असलेल्या नक्षली तळाला पोलिसांनी घेरले होते. रात्रभर पायी जंगल तुडवून नक्षलविरोधी c-६० कमांडो छत्तीसगड हद्दीत दाखल झाले आणि पहाट होताच बेसावध असलेल्या नक्षल्याना आत्मसमर्पणाची संधी दिली. मात्र त्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्यावर पर्याय संपले आणि सुरू झाली अभूतपूर्व चकमक. सकाळी ६ ते दुपारपर्यंत ही चकमक सुरूच राहिली. या चकमकीच्या पुराव्यांदाखल इंद्रावतीच्या पात्रात नक्षली पुरुष आणि महिला सदस्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य, पाण्याच्या बॅग, तेल- ब्रश- पेस्ट- कपडे, आय कार्ड्स त्यांची पत्रें चपला जोडे इतस्ततः विखुरलेले नजरेस पडले.
नदीच्या पात्रात व कडेला चकमकीच्या या खुणा स्पष्टपणे नजरेस पडत असताना आम्ही शोधत होतो ती जागा अखेर नजरेस पडली. नक्षल्यांच्या प्रत्यक्ष तळाची जागा. मोठ्या कमांडर्स च्या मुक्कामाची जागा, जेवण बनविण्याची जागा, स्नान आणि कपडे धुण्याची जागा आणि तळातील समूहाच्या इतर सदस्यांची जागा. या सर्वांशी संबंधित वस्तू चकमकीच्या कल्लोळात उधळून गेलेल्या स्पष्ट नजरेस पडल्या. या भागात असेही काही भाग होते जिथे नैसर्गिक आच्छादन आणि चॉपर ला चकमा देईल अशी रचना असलेले भाग होते. या भागातील शेकडो झाडांवर गोळ्या लागल्याच्या खुणा अजून ताज्या होत्या तर काही ठिकाणी रक्ताचे थारोळेही. गेली काही वर्षे नक्षल चळवळीत महिला सदस्यांना मोठी पदे दिली जात आहेत. या चकमकीत अधिक संख्येतील महिला नक्षली टिपल्याची नोंद बोलकी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी जीवाची बाजी लावून छत्तीसगड सीमेत शिरून हे अभियान यशस्वी केले. हे विशेष. काय होती या सर्वोत्तम आखणीची नेमकी गाथा.
या चकमकस्थळावर आजवर एकही माध्यम पोचले नाही. सर्वात प्रथम पोचली ती झी मीडियाची चमू. ऐतिहासिक चकमकी मागील कष्ट समजून घेण्यासाठी. या स्थळावरून सूर्य मावळण्याआधी निघणे जिवित रक्षणासाठी आवश्यक होते. मात्र निघताना नक्षली तळावर कमांडर दर्जाचा अधिकारी हजर असताना उभारण्याची ' संत्री गार्ड' जागा आम्हाला बघायला मिळाली. अगदी एखाद्या पोलीस ठाण्यात शिरण्यासाठी असते तशी प्रारंभीच, संकटाची प्रथम वर्दी देणारी.हे चकमस्थळ सोडून आम्ही पुन्हा परत निघालो. वाहन ठेवलेल्या जागी. इंद्रावती मायचे अजस्त्र-अवाढव्य आणि खडकाळ पात्र ओलांडून जाण्यासाठी. मात्र या वेळेस मनात होता गडचिरोलीतील पोलीस जवानांच्या प्रतीचा वाढलेला अभिमान आणि त्यांच्या लोकशाही अबाधित राखण्याच्या निर्धाराचें कौतुकही.