एका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल

Satara News : साताऱ्यातील एका गावात 500 गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर उभं केलं आहे. रात्रभर श्रमदान करुन गावकऱ्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. पहाटेच्या सुमारास आरती करुन मंदिरात रवळेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 30, 2023, 11:30 AM IST
एका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : देशभरात सध्या अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराची चर्चा सुरु आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांची या मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुन मजूरांनी काही दिवसांमध्येच हे भव्यदिव्य मंदिर उभं केलं आहे. अनेक हातांनी झटत या मंदिराची निर्मिती केली आहे. अशातच साताऱ्यातही एका गावात गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर बांधलं आहे. या मंदिराची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.

सातारा तालुक्यात नागठाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. साताऱ्याच्या नागठाणे जवळच्या चाहूर परिसरात असणारे रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प पूर्ण केलाय. नागठाणे गावापासून काही अंतरावरच झाडाझुडपात शंभू महादेवाचा अवतार असणाऱ्या रवळेश्वराची उघड्यावर असणारी मूर्ती गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. गावातील अनेक ग्रामस्थ या देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असत याविषयी ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मूर्तीसाठी एक मंदिर बांधण्याचे नियोजन केले होते.

गावकऱ्यांनी एका रात्रीत मंदिर बांधण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या मंदिराच्या पायाबांधणीला सुरुवात झाली आणि नागठाणे सह पंचक्रोशीतील 500 ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराची एका रात्रीत उभारणी केलीय. हे मंदिर बांधत असताना रात्रभर होम हवन करत होती. त्यानंतर सकाळी रवळेश्वराची आरतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

"अशी अख्यायिका आहे की ही पांडवकालीन मूर्ती एका झाडाखाली ठेवण्यात आली होती. एका रात्रीत हे मंदिर पूर्ण केले तर गावात रोगराई किंवा इतर समस्या निर्माण होणार नाही, गावासह पंचक्रोशीतील लोकांचे संरक्षण होईल, असे आमच्या पूर्वजांनी सांगितले होते. त्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले पण कोणालाच यश आलं नाही. त्यामुळे हाती संकल्प घेतला होता. एका रात्रीत मंदिर पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. दिवस मावळल्यानंतर याची सुरुवात करायची होती. कृष्णा नदीचे पाणी यासाठी लागणार होतं. तसा प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार पाडला आहे. चार ते पाच गावांचा यामध्ये सहभाग होता. पाचशे लोक मंदिर बांधण्यासाठी उपस्थित होते," अशी माहिती नागठाणे इथल्या ग्रामस्थाने दिली.