Modi Fadnavis Pressurize Shinde: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरमामध्ये आरोपी होते. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने तपास सुरु केला होता. त्यामुळेच अटकेच्या भीतीने फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर दबाव आणून सरकार पाडल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तपास सुरु होता असं सांगताना कारवाईच्या भीतीला घाबरुनच फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंवर अटकेचा दबाव टाकत आमदार फोडल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोदी सरकार अटक का करणार होतं हे विचारावं असं राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं. "तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?" असं राऊत प्रसारमाध्यमांना म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंना थेट आव्हान देताना राऊत यांनी, "मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती? याचं आधी उत्तर द्या. त्यानंतर तुम्ही इतरांची नावं घ्या," असा खोचक टोला लगावला. राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीस हे मुख्य आरोपी होते आणि त्यांच्याविरुद्ध ठाकरे सरकारने तपास सुरु केला होता असा दावा केला. या प्रकरणामध्ये विद्यमान पोलीस निर्देशक रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु करण्यात आली होती. मात्र नंतर या एफआयआर रद्द करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> 'असं खोटं बोलून काय मिळतं?' 'त्या' Viral Video वरुन जय पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्याबरोबरच रश्मी शुक्लांचा उल्लेख करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. "(फोन टॅपिंग प्रकरणात भाजपाच्या तीन प्रमुख नेत्यांसहीत) चार लोकांविरोधात तपास सुरु झाला तर मोदी आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवर दबाव आणला. आम्ही तुम्हाला अटक करु. तुम्ही आमदार फोडा आणि आमच्याकडे या नाहीतर तुम्हाला अटक केली जाईल. हा असा खेळ आहे," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती, आपण फार मोठा...'; राऊतांचा दावा
"प्रवीण दरेकर त्यांच्याविरोधात मुबैं बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु होती. तिथे हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. सिंचन घोटाळ्याबरोबर इतर अनेक प्रकरणांमध्ये 50 लाख, 10 लाखांसाठी भाजपावाल्यांनी लोकांना अटक केली ना? मग या लोकांना काय कायदा हात लावू शकत नाही का? हे सर्व लोक प्रसाद लाड, आशिष शेलार सर्वांविरोधात आरोप होते आणि तपास सुरु होता," असं राऊत म्हणाले आहेत.
नक्की वाचा >> 'भवानी मातेशी वैर म्हणजे..', ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, 'प्रश्न हिंदुत्वाचा नसून..'
"तुम्ही आमच्या लोकांना कधीही अटक करु शकता. पण तुमच्या राजकीय पक्षात जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हात लावू शकत नाही? असं होणार नव्हतं," असंही राऊत म्हणाले.