Breaking : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी

न्यायमुर्ती एम जी देशपांडे यांनी सुनावणी घेतली होती. 

Updated: Aug 1, 2022, 07:33 PM IST
 Breaking : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी (Enforcement Directorate) कोठडी सुनावण्यात आली आहे.पीएमएलए कोर्टाने हा निर्णय़ दिलाय. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊंताची 8 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. मात्र न्यायालयाने केवळ चार दिवसांची कोठडी मंजूर केली. तसेच राऊत यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्याची सुविधा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. ईडीला संजय राऊत यांच्या औषधे इत्यादींची काळजी घ्यावी लागेल आणि चौकशीचे तासही निश्चित करावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज संजय राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी आणि ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, संजय राऊत यांची अटक हा राजकीय कटाचा भाग आहे. राऊत यांना हृदयाशी संबंधित समस्या असून, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. न्यायालयात संबंधित कागदपत्रेही दाखविण्यात आली होती.  

संजय राऊत यांना अनेकदा समन्स बजावले होते. मात्र समन्स बजावून सुद्धा हजर न राहिल्याने रविवारी ईडीने थेट संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी धाड टाकली होती. या कारवाईत ईडीने तब्बल 9 तास संजय राऊत यांची चौकशी केली. या चौकशीनंतर संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक केली होती. तसेच ईडीने राऊत यांच्या च्या घरातून 11.5 लाख रुपये जप्त केले होते. 

ईडीचे वकील काय म्हणाले? 

ईडीचे वकील अ‍ॅड हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, या रकमेतून (1.6 कोटी) अलिबागच्या किहीम बीचवर जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. सपना पाटकर यांच्या नावावर भूखंड घेण्यात आला. प्रवीण राऊत हा संजय राऊतचा फ्रंट मॅन असल्याचेही तपासात समोर आले आहे. संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते एकदाच एजन्सीसमोर हजर झाले. यावेळी संजय राऊत यांनी पुराव्याशी छेडछाड करून साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याचा थेट फायदा संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना झाला आहे. राऊत कुटुंबाने मनी लाँड्रिंग केले असल्याचेही सांगितले आहे.

संजय राऊत यांचे वकील काय म्हणाले?
मुंदरगी यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलांना त्याच्यासोबत उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. कोर्टाने, वकील चौकशीदरम्यान बसू शकतात, परंतु त्यांना काही अंतर राखून उभे रहावे लागेल असे सांगितले. तसेच ईडीने त्यांना औषधे आणि घरचे जेवण देण्यास आमची हरकत नसल्याचे सांगितले आहे. मुंदरगी पुढे म्हणाले की, संजय राऊत हे हार्टचे रुग्ण असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करू नये. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होईल. यावर ईडीने सांगितले की ते सकाळी 8.30-9.30 पर्यंत त्याच्या वकिलांना भेटू शकतो आणि आम्ही रात्री 10.30 नंतर त्याची चौकशी करणार नाही.