अमित शाहांनी बंद दाराआडचं मोदींना सांगायला हवं होतं- संजय राऊत

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले

Updated: Nov 14, 2019, 11:48 AM IST
अमित शाहांनी बंद दाराआडचं मोदींना सांगायला हवं होतं- संजय राऊत  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बंद दाराआड जी चर्चा झाली ती पंतप्रधानांपर्यंत नेली असती तर इतकी वेळ आली नसती. ही बंद खोली सामान्य खोली नव्हती. ज्या खोलीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदींनी इथे आशिर्वाद घेतला. इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्यासाठी हे मंदिर आहे. या मंदीरात ही चर्चा झाली. संपूर्ण देशाची श्रद्धा या मंदिराशी जोडली गेली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही कधी खोट बोलणार नाही. आम्ही खोट्याचे राजकारण करणार नाही. 

ही चर्चा बंद खोलीत नव्हे तर मंदिरात झाली. या मंदिराला, चर्चेला तुम्ही नाकारत असाल तर तुमच्या तुम्हाला शुभेच्छा असल्याचे राऊत म्हणाले.

देवेंद्रे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून वारंवार सांगितले. त्यावेळी शिवसेनेने प्रश्न का उपस्थित केला नाही ? असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला होता. त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिले. आम्ही व्यासपीठाचे पावित्र्य जपत पंतप्रधान मोदींचा सन्मान राखला. 

आम्ही व्यापारी नाही. आमच्या महाराष्ट्राची देण्याची वृत्ती आहे. कोणाचे ओरबडून खाण्याची वृत्ती नसल्याचे ते म्हणाले. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा आम्ही नेहमीच सन्मान ठेवला. पण दुसरी बाजू काय आहे हे सांगणे आमचे कर्तव्य आहे. 

आम्हाला घाबरवून आमच्यावर परिणाम होणार नाही. आम्ही मावळे घाबरणार नाही. आम्ही लढू संपू आणि घाबरवणाऱ्यालाही संपवू असा इशाराही त्यांनी दिला.