मुंबई : महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे. कोणालाही सत्ता स्थापन करता आली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. शिवसेना आणि भाजप युतीला पूर्ण बहुमत होते. मात्र, सत्तेतील वाट्यावरुन युतीत वाद टोकाला गेला आणि युती तुटली. भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्यात. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून आमदरांची फोडाफोड होईल म्हणून शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलवर ठेवले होते. जेणेकरुन अन्य पक्षाला त्यांचा संपर्क होणार नाही. दरम्यान, आज शिवसेनेने मुंबईत ठेवलेल्या आमदारांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेचा राजकीय पेच आणि राज्यात लागू झालेली राष्ट्रपती राजवट या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांचा हॉटेल रिट्रीटमधील मुक्काम हलविण्यात येणार होता. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हॉटेल रिट्रीटमधून आज रात्रीच हे आमदार गावाकडे जाण्यास निघणार आहेत. तसेच त्यांना आपल्या मतदारसंघात जाण्याचे आदेशही देण्यात आले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी शासनदरबारी मदत करण्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर घोडेबाजार होऊ नये म्हणून शिवसेनेने त्यांच्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या ६३ आमदारांना मालाड येथील हॉटेल द रिट्रीटमध्ये ठेवले होते. तर काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूरमध्ये नेऊन ठेवले होते. शिवसेनेचे आमदार गेल्या सहा दिवसांपासून या हॉटेलमध्ये होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे हॉटेलमध्ये येऊन या आमदारांशी संवाद साधत होते. आपलेच सरकार येणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, काल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी जास्त कालावधी मिळाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार आहेत. मात्र त्यासाठी दोन्ही पक्ष किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी समन्वय समितीची बैठकही सुरु आहे. या बैठकीनंतर ते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तिन्ही पक्ष मिळून सत्तास्थापन्याचे निश्चित करणार आहेत.